पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून सचिन अहिर ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंधनात

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवबंधन बांधले आहे. आज सकाळी अकरा वाजता मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सचिन यांनी ‘पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत’, असे सांगितले. सचिन अहिर यांचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मनापासून स्वागत केले. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे चांगले योगदान असेल, अशी आशा उद्धव ठाकरेंनी वर्तवली. तर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सचिन अहिर म्हणाले.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाची माहिती अधिकृतपणे सर्वात अगोदर आदित्य ठाकरे यांनी दिली. ‘सचिन अहिर यांच्यासोबत आपली चर्चा झाली. त्यांचे विचार आपल्याला आवडले. याशिवाय त्यांनी देखील शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यानुसार मी सचिन यांची उद्धव साहेबांशी भेट घडवून दिली. पक्षाला वाढवण्यासाठी सचिन अहिर महत्त्वपूर्ण योगदान देतील’, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘पक्ष फोडणे ही शिवसेनेची वृत्ती नाही. चांगला माणूस सोबत जोडून शिवसेनेला आणखी मोठे करायचे आहे’, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सचिन अहिर म्हणाले की, ‘शिवसेनेच केंद्र बिंदू म्हणून नाही तर विकास म्हणून पुढे नेण्याचा काम उध्दव ठाकरे यांनी केले. एक वेळ होती की मी शिवसेनेवर वेगळी टीका केली होती. त्यावेळी आम्ही जेवायला गेलो होतो. दोघांनी हस्त आंदोलन केले. पवार साहेब हृदयात राहतील तर शरीरात उध्दव आणि आदित्य राहतील. राष्ट्रवादी तोडणार नाही तर शिवसेना पक्ष वाढवणार. मोठया जिद्दीने आणि जोमाने माझे कार्यकर्ते काम करतील आणि महाराष्ट्रात सत्तेत येतील. मी गेल्या आठवड्यात पवार साहेबांना भेटलो, माझ्या मतदारसंघाची माहिती सांगितली.’ त्याचबरोबर काही पक्षातील नेत्यांनी आपला निर्णय सकारात्मक असल्याचे अहिर म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमचं स्वागत करताना आनंद होतो. राजकारणी राजकारणात वागावं लागत. मला फोडलेली मानसे नको, मनाने जिंकणारी माणसे हवेत. सर्व हसत मुखाने या क्षणाचे साक्षीदार झालेत याच आनंद होतोय. शिवसेनेची ताकद वाढतेय. नुसती शिवसेना नाही तर मराठी माणसाची आणि हिंदूंची ताकद वाढतेय. मला खात्री आहे आपल्या निर्णयाचा पच्छाताप होणार नाही आणि हिंदू व मराठी माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. शिवसेनेत चांगली लोक येत आहेत. घड्याळची दोरी काढली नाही तर त्याला चावी देण्याचं काम करतोय.’ यासोबतच नीतिमत्ता गहाण सोडुन वागणार नाही, असेही उद्धव म्हणाले.
मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. अहिर यांच्या पत्नी संगीता अहिर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अहिर यांच्या पक्षांतरामुळं शिवसेनेचं बळ वाढणार असून मुंबईत आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे. सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीकडून लढून पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळं काळाची पावलं ओळखून त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचं समजतं. मात्र, ते करताना त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. शिवसेनेकडून ते भायखळा विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या एमआयएमचे वारीस पठाण हे आमदार आहेत.