‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ : लक्ष्मण माने , कोळसेपाटील यांच्या नव्या पक्षाची घोषणा

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. आता या पक्षाच्या माध्यमातून ते प्रकाश आंबेडकर यांना आव्हान देणार आहेत. २९ जुलै रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असून, माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
दुसरीकडे विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना लक्ष्मण मानेंकडून नवा पक्ष तयार करण्यात आल्याने आता भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची अडचण झाल्याचे दिसत आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण मानेंनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना माने यांनी सांगितले की, विधानसभेसाठी आम्ही डाव्या आघाडीबरोबर जाणार आहोत. यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांच्या पक्षांशी चर्चा करणार आहोत. तर लोकसभा निवडणुकीत झालेली चुक आता करायची नसल्याचे सांगत, जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचेही ते म्हणाले.