Bad News : फी भरायला पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, सोलापुरातील घटना

शिक्षण घेण्याची इच्छा असूनही फी भरायला पैसे नसल्या कारणाने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात ही घटना घडली आहे. रुपाली पवार असं या विद्यार्थिनीचं नाव असून मोहोळ तालुक्यातील देगावची ती रहिवासी होती. कीटकनाशक प्राशन करुन रुपालीने आत्महत्या केली. रुपालीच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.
रुपालीचा बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता. पंजाबमधील जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीत ती बीटेकचं शिक्षण घेणार होती. महत्त्वाचं म्हणजे सीईटी पात्रता परीक्षेत तिने ८९ टक्के गुण मिळवले होते. प्रवेश निश्चित करण्यासाठी दहा हजार रुपयेही भरले होते. मात्र उर्वरित एक लाखांची रक्कम भरण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. तिच्या वडिलांनी शेती विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला. पण योग्य भाव न मिळाल्याने वेळेत फी भरणं शक्य झालं नाही. यामुळे हताश झालेल्या रुपालीने कीटकनाशक प्राशन करत आत्महत्येचा पर्याय निवडला.