अंबरनाथ : सात वर्षीय चिमुरडीला फूस लावून लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

अंबरनाथ चिखलोली एमआयडीसी भागात एका सात वर्षीय चिमुरडीला फूस लावून एमआयडीसीपासून काही अंतरावर असलेल्या जंगलसदृश्य भागात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर नागरिकांनीच आरोपी आशुतोष चौबे (३३) याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अंबरनाथ पूर्व भागातील चिखलोली एमआयडीसी भागात काही बिहारी कुटुंब मजुरी करण्यासाठी वास्तव्य करत आहेत. याच भागात काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथून आलेला आशुतोष चौबे हाही वास्तव्य करत आहे. बेरोजगार असलेला आशुतोष याने शुक्रवारी दुपारी सात वर्षांची मुलगी घरात एकटी असताना तिला घराबाहेर बोलवत तिला खेळण्याच्या नादात गुंतवून तिला एमआयडीसीपासून काही अंतरावर असलेल्या डोंगराच्या भागात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कृत्याला मुलीने विरोध केला असता, आरोपीने मुलीला मारहाण करत तिचे दात तोडल्याचीही माहिती समोर येत आहे.
अखेर या प्रकारानंतर मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला असता, मुलीचे पालक आणि परिसरातील नागरिकांनी आशुतोष चौबै याला पकडून चोप देत अंबरनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आशुतोषला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याचा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे एमआयडीसी चिखलोली परिसरात परराज्यांतून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे.