पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या भेटीत काय झाले ?

भाजपचे नेते आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जावडेकर यांनी उद्धव यांची भेट घेतल्याने या भेटीत जागा वाटपावर आणि कोस्टल रोडच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रकाश जावडेकर यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली. या भेटीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी युती करण्यावर आणि जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्यचं सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांतही भाजपव शिवसेना यांच्यात युती व्हावी, असे भाजप नेतृत्वाचे म्हणणे आहे. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये जागावाटप कशाप्रकारे व्हावे याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांसाठी युती जाहीर करतानाच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निम्म्या निम्म्या जागांचे वाटप व्हावे असे ठरले होते. मात्र निम्म्या निम्म्या जागा वाटून घ्यायचे ठरले असले तरी त्या निम्म्या जागा कोणत्या असाव्यात, त्यासाठीचे निकष काय असावेत यावरून सध्या शिवसेना भाजप यांच्यात पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपादरम्यान शिवसेनेकडून सुभाष देसाई तर भाजपकडून प्रकाश जावडेकर असे दोन्ही नेते चर्चा करत होते. त्यामुळे विधानसभा जागावाटपासाठीही प्राथमिक चर्चा करण्यासाठी केंद्राकडून प्रकाश जावडेकर यांना धाडण्यात आल्याचे कळते. मात्र याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणताही दुजारो देण्यात आलेला नाही.