ईव्हीएम च्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र , राज ठाकरे यांचाही सहभाग

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देश आणि राज्यातील विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’ मशिनच्याविरोधात नाराजी व्यक्त केली असून, आता ही नाराजी येत्या क्रांतीदिनी, अर्थात ९ ऑगस्टला मोर्चाच्या स्वरूपात व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम’ला सर्वांत जास्त विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर ही मंडळी इतर विरोधी पक्ष नेत्यांसोबत एकत्रित एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच देश आणि राज्य पातळीवर विरोधकांनी ‘ईव्हीएम’विरोधात नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकात भाजप देशभरात आघाडीवर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तर विरोधकांनी ‘ईव्हीएम’विरोधात अधिकच उचल घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तर जाहीररीत्या पत्रकार परिषद घेऊन ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनीही मशिनविरोधात भूमिका जाहीर केली आहे.
राज यांनी अलिकडेच ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या भेटीनंतर राज यांनी थेट यूपीएच्या नेत्या आणि काँग्रेसच्या मार्गदर्शक सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. ‘ईव्हीएम’विरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी सोनिया यांच्याकडे मांडली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका मतपत्रिकेच्या आधारेच व्हाव्यात, यासाठी विविध राजकीय पक्ष तसेच संघटना ९ ऑगस्टला मोर्चाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. यानिमित्त राज, आंबेडकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ही सर्व एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.