Honor Killing : मर्जीविरुद्ध विवाह केल्याने घाटकोपरमध्ये वडिलांनीच केली मुलीची हत्या, ४ महिन्यांची गरोदर होती मुलगी !!

घाटकोपरमध्ये वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केल्यामुळे ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मीनाक्षी चौरसिया २० वर्षीय मुलीचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध वडील राजकुमार चौरसिया यांना मान्य नव्हते. त्यांनी मीनाक्षीचे दोन वेळेस लग्न इतर ठिकाणी जमवले होते. मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा वडिलांनी जमवलेल्या लग्नास नकार दिला होता. मृत मीनाक्षीने प्रियकर ब्रिजेश चौरसियासोबत विवाह केला. त्याचा आरोपी वडिलांना याचा राग आला. लग्नानंतर काही महिन्यांनी मीनाक्षीच्या वडील आणि सासरच्यांचे संबंध सुधारले होते. मात्र मुलीच्या प्रेमविवाहाचा राग डोक्यात ठेवून काल तिच्या वडीलांनी पैसे आणि कपडे देतो या बहाण्याने तिला काल घराबाहेर बोलवले. मीनाक्षी घराबाहेर येताच तीक्ष्ण हत्याराने तिच्या पोटावर, गळ्यावर निघृणपणे वार केले. दरम्यान पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मीनाक्षी ही ४ महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेली माहिती अशी की, घाटकोपरच्या नारायण नगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर मीनाक्षीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. काही रिक्षा चालकांना हा मृतदेह फुटपाथवर आढळला होता. माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनीही पाहणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी (१२ जुलै) रात्री देखील घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरूणाची हत्या झाली होती. सलग दुसरी हत्येची घटना समोर आल्याने घाटकोपर हादरून गेले आहे.