नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बिहार, आसाममध्ये पुराचे थैमान, २३ जणांचा मृत्यू

सततच्या मुसळधार पावसामुळे आसाम, बिहार या राज्यांना पुराचा फटका बसला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसाम आणि बिहारमधील अनेक भाग पुर्णतः पाण्याखाली आहे. आतापर्यंत दोन्ही राज्यात मिळून २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
आसाममध्ये जवळपास १० लाख नागरिक बेघर झाले आहेत. मागिल ७२ तासांत किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे ३३ जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. राज्यातील १८०० गावांना याचा फटका बसला आहे.
बिहारमध्ये पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. आगामी २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्या गेली आहे. शिवाय अतिदक्षतेचा इशारा देखील दिला गेला आहे. जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. बिहारच्या उत्तर भागात पूर परिस्थिती आहे. प्रभावित सीतामढ़ी, मोतिहारी, सुपौल, सहरसा, अररिया, किशनगंज, कटिहार, भागलपुर आणि पूर्णियासह अनेक गावांना पुराचा जास्त फटका बसला आहे.
काझीरंगा नॅशनल पार्कला देखील पूर परिस्थिपतीचा फटका बसला आहे. उद्यानाचा जवळपास ७० टक्के परिसर पाण्याखाली गेला आहे. येथील प्राण्यांचे देखील पाणी पातळी वाढल्यामुळे हाल होत आहेत. देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या पूर परिस्थितीला घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी विरष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आहे. याशिवाय २७ हचार हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ७००० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.