Loksabha 2019 : केंद्र सरकारने मराठवाड्याचा रेल्वे प्रश्न सोडवावा , संसदेत खा. इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले प्रश्न

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे ‘गेल्या ७० वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असून त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील अन्य शहरांचे नुकसान होत आहे. सरकारने रेल्वे प्रश्नांचा अनुशेष दूर करून मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे,’ अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत बुधवारी ‘शून्य प्रहरा’मध्ये रेल्वे अर्थसंकल्पाच्या चर्चेत जलील यांनी मराठवाड्याचे रेल्वे विषयक प्रश्न मांडले. औरंगाबादमध्ये पिटलाइन तयार करावी. नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडा. औरंगाबाद रेल्वे मार्ग ब्रॉडगेज केल्यानंतर या रेल्वे मार्गाचा विकास झालेला नाही. यामुळे मनमाड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करावे. या मार्गावर रेल्वेची वाहतूक अधिक वेगाने व्हावे यासाठी रेल्वे इलेक्ट्रीफिकेशन करण्यात यावे. औरंगाबाद, दौलताबाद, चाळीसगाव, रोटेगाव कोपरगाव कॅडलाइन रेल्वे मार्गाचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी औरंगाबाद – अजमेर – जयपूर, औरंगाबाद – जोधपूर, उदयपूर, बंगळुरूसह मुंबई आणि दिल्लीसाठी रेल्वे सेवा वाढविण्यात यावी. गेल्या दहा वर्षांपासून औरंगाबाद मॉडेल रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात आलेला नाही. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून लवकरात लवकर रेल्वे स्टेशनचे काम सुरू करावे, अशी मागणी खासदारांनी लोकसभेत मांडली.
दरम्यान औरंगाबादमधील मुकुंदवाडी हे डी क्लासचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाला मुंबई, सिकंदराबादसह अन्य महत्त्वाच्या शहराप्रमाणे सर्बबन रेल्व स्थानकाचा दर्जा देऊन या ठिकाणी एक्स्प्रेस रेल्वे थांबविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली.