Bad News : पतीच्या ‘एन्काऊंटर’ची धमकी देऊन पोलिसांचा महिलेवर बलात्कार, दोन पोलीस निलंबित

गुन्हेगारांविरुद्ध ‘एन्काऊंटर’ची माहिम उघडल्याने उत्तर प्रदेश पोलिसांची देशभर चर्चा होत आहे . यात अनेक नामचीन गुंड मारले गेले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळाही बसलाय. मात्र आता त्याच्या दुरुपयोगाच्या घटनाही पुढे येताहेत. उत्तर प्रदेशातल्या एटामध्ये पोलिसांनी एका महिलेला धमकावत तिच्या पतीला खोट्या ‘एन्काऊंटर’प्रकरणात मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. ती महिला गर्भवती राहिल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली. पोलीस महासंचालकांनी आरोपी पोलिसांना निलंबीत केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातल्या एटाजवच्या एका गावातली ही घटना आहे. योगेश तिवारी आणि प्रेम कुमार गौतम हे पोलीस एक वॉरंट घेऊन एका व्यक्तिच्या घरी गेले होते. मात्र त्यावेळी घरात फक्त त्याची पत्नी होती. घराच महिला एकटीच असल्याचं पाहून त्या दोघांनी तिला धमकावलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
हे दोनही पोलिस सतत पाच महिने बलात्कार करत होते असा आरोप पीडीत महिलेने केला आहे . त्यांनी तिचे अश्लील व्हिडीओही तयार केलेत आणि ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. काही महिन्यांनी महिला गर्भवती राहिली आणि प्रकरण बाहेर आलं. आपल्या पोटातलं बाळ हे त्या पोलिसांचं आहे असंही तीने आपल्या तक्रारीत सांगितलं. योगेश तिवारी आणि प्रेम कुमार गौतम या दोनही आरोपी पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आलं असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. हे दोघही जण अवागढ पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर होते. या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सगळ्या मोहिमेवरच शंका निर्माण झाली आहे.