Mumbai : नाल्याच्या मॅनहोलध्ये पडलेल्या दोन वर्षाचा मुलाचा नऊ तास उलटले तरी शोध लागेना

मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये पडलेल्या दोन वर्षाचा मुलाचा नऊ तास उलटले तरी अद्याप शोध लागलेला नाही. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि पालिका कर्मचारी बुधवारी रात्रीपासून या मुलाचा शोध घेत आहेत. हा मुलगा नाल्यात पडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मात्र नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मुलगा वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालाडच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील एका नाल्यात दिव्यांशू हा दोन वर्षाचा मुलगा पडला. बुधवारी रात्री १०.२४ वाजता ही घटना घडली. घरातून खेळता खेळता दिव्यांशू रस्त्यावर आला. रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरून तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमधून स्पष्ट झालं आहे. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या आसपास कोणीच नसल्याचंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
या घटनेच्या २० ते ३० सेकंदानंतर दिव्यांशूची आई त्याला शोधताना दिसत असल्याचंही या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. मुलाचा शोध लागत नसल्याने त्याच्या आईने आरडाओरड केला. त्यानंतर बाजूच्याच मशिदीबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता हा मुलगा नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडल्याचं आढळून आलं. हा प्रकार उघड होताच पोलीस, पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ तासांपासून या मुलाचा शोध सुरू केला आहे. मात्र त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. गेल्या वर्षी प्रभादेवी येथे नाल्याचा मेनहोल उघडा राहिल्याने एका डॉक्टरचा त्यात पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतरही मेनहोलचे झाकण सर्रासपणे उघडे ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा पालिका प्रशासनावर टीका होत आहे.