सीबीआयच्या छाप्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात सापडले ४७ लाखांचे घबाड !!

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारपासून उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी छापे मारले असून बुंदेलखंडचे जिल्हाधिकारी अभय सिंहयांच्या घरातून आज तब्बल ४७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अभय सिंह यांच्यावर खाण घोटाळा प्रकरणी ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे . अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हाधिकारी होते. या दरम्यान मनमानी पद्धतीने कारभार करत त्यांनी अनेक ठिकाणी खाण घोटाळे केले होते. उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून त्यांनी अवैध खाणकामाला परवानगी दिली असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.
आज सकाळी सीबीआयने अभय सिंह यांच्या घरी व कार्यालयावर अचानक धाड टाकली. तब्बल दोन तास चौकशी सुरू होती. या छापेमारीत मोठे घबाड हाती लागले. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणात रोकड असल्याने नोटा मोजण्यासाठी पैसे मोजण्याची मशीन अभय सिंह यांच्या घरी मागवावी लागली. अभय सिंह यांच्या घरातून ४७ लाख रूपये जप्त केले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत. बुलंदशहर सोबतच लखनऊ, फतेहपुर, आझमगढ, प्रयागराज, नोएडा, गोरखपूर, देवरिया येथेही सीबीआयने धाडी टाकल्या. देवरियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी देवी शरण उपाध्याय यांच्या घरातून १० लाख रुपये रोकड आणि बेनामी संपत्तीची अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली.