Karnatak Political Derama : काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार मुंबईत आले तसे परत पाठवले गेले ….

कर्नाटकातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा बेंगळुरूत धाडले आहे. पोलिसांनीच शिवकुमार यांना विमानतळावर नेऊन सोडले. कर्नाटकातील सत्तानाट्यात मुंबई हा केंद्रबिंदू ठरला आहे. काँग्रेसचे कर्नाटकातील प्रमुख नेते डी. के. शिवकुमार आज मुंबईत दाखल झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी शिवकुमार आले होते मात्र, झालं उलटंच. बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार करत पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्यामुळे आमदार जिथे थांबले होते त्या पवईतील रेनिसन्स हॉटेलबाहेर मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू केली.
आमदारांच्या भेटीवर शिवकुमार अडून बसले होते. पोलिसांनी मनाई करूनही ते आपल्या म्हणण्यावर ठाम होते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांच्यासह मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा, नसीम खान यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या सर्वांना नंतर सोडण्यात आलं असून पोलीस शिवकुमार यांना घेऊन विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांना बेंगळुरूत परतण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने या संपूर्ण प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला असून पोलिसांनी शिवकुमार यांना जबरदस्तीने बेंगळुरूत पाठवल्याचा आरोप देवरा यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना रेनिसन्स हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची तक्रारही पवई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.