वामन हरी पेठे ज्वेलर्स फसवणूक प्रकरण : राजेद्र जैन याने सोने तारण ठेवून घेतले ४ कोटी रुपयांचे कर्ज, मन्नपुरम फायनान्स येथून २१ किलो सोने जप्त

समर्थनगर परिसरातील नामांकित वामन हरी पेठे ज्वेलर्समधून २७ कोटी ३१ लाख रुपये किमतीचे सोने लांबविल्याप्रकरणी व्यवस्थापकासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.४) गजाआड केले. अटकेत असलेल्या राजेंद्र किसनलाल जैन व त्याचा भाचा लोकेश जैन यांनी रेल्वेस्टेशन रोडवरील मन्नपुरम फायनान्स येथे तब्बल २१ किलो सोने गहाण ठेवून ४ कोटी ४३ लाख ४८ हजार ९८७ रुपयांचे कर्ज घेतले होते. मन्नपुरम फायनान्स येथून पोलिसांनी शुक्रवारी (दि.५) २१ किलो सोने जप्त केले.
समर्थनगर परिसरात गेल्या नऊ ते दहा वर्षापासून वामन हरी पेठे ज्वेलर्सची शाखा आहे. या शाखेतील व्यवहाराची नोंदणी व स्टॉकबाबतची माहिती ऑनलाईनरित्या मुंबईच्या दादर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयाला पाठविली जाते. समर्थनगरात वामन हरी पेठे ज्वेलर्सची शाखा सुरु झाल्यापासून अंवूâर राणे (रा.दापोडी, जि.रत्नागिरी) हा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. दरम्यान, अंकुर राणे याने वामन हरी पेठे ज्वेलर्स येथील दागीन्यावरील टॅग काढुन स्वतःजवळ ठेवत, दागीन्यांचे डूप्लीकेट बील तयार करुन तब्बल ५८ किलो वजनाचे सोने-चांदी, हिऱ्याचे दागीने कापड व्यावसायीक राजेंद्र किसनलाल जैन, राजेंद्र जैनची पत्नी भारती जैन, लोकेश जैन यांना दिले होते. राजेंद्र व त्याचा भाचा लोकेश जैन यांनी अंकुर राणे याच्याकडून घेतलेले दागीने मन्नपुरम फायनान्स कंपनीत गहाण ठेवून ४ कोटी ४३ लाख ४८ हजार ९८७ रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जातून जैन यांनी तीन आलीशान कार व समर्थनगरातील अपार्टमेंन्टमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.
नोव्हेंबर ते डिसेंबर २०१८ या काळात मालक विश्वनाथ प्रकाश पेठे (वय ४८, रा. चित्तरंजन रोड, विलेपार्ले, पुर्व मुंबई) यांनी समर्थनगरातील ज्वेलर्सला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सोन्याच्या स्टॉकची पाहणी केली. तेव्हा तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने गायब झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी तब्बत सात महिन्यानंतर विश्वनाथ पेठे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक फौजदार सुभाष खंडागळे, जमादार प्रकाश काळे, कारभारी गाडेकर, गणेश शिंदे, सुनील फेपाळे, नितीन देशमुख, नितीश घोडके, जयश्री फुके आणि जयश्री म्हस्के करीत आहेत.