अभियंता चिखलफेक प्रकरणी , आ. नितेश अणे यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या १६ समर्थकांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जाब विचारत नितेश राणे आणि समर्थकांनी गुरुवारी उपअभियंता प्रकाश खेडेकर यांच्या अंगावर चिखलफेक केली होती. याप्रकरणी खेडेकर यांच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी नितेश राणे आणि समर्थकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले होते.
मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून धुवांधार पावसामुळे या महामार्गाची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी प्रचंड चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहनचालकांसह नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत आमदार नितेश राणे, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता खेडेकर यांना गडनदीजवळ महामार्गावर बोलावून त्यांना जाब विचारत त्यांच्या अंगावर चिखल भरलेल्या बादल्या ओतल्या होत्या. त्यानंतर त्यांना नदीच्या पुलाच्या कठड्याला बांधूनही ठेवले होते.