Gujrat : हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावली १२ पैकी ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, गुजरात उच्च न्यायालयाने केली होती निर्दोष मुक्तता

गुजरातचे तत्कालीन गृह मंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलत सर्वोच्च न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २००३ मध्ये घडलेल्या या हत्याकांडातील सर्व १२ आरोपींची गुजरात उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हरेन पांड्या गृह मंत्री होते. त्यांची २६ मार्च २००३ रोजी अहमदाबादमधील लॉ गार्डन भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २००२ मधील गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी पांड्या यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला होता. हा खटला विशेष पोटा न्यायालयात चालला आणि न्यायालयाने सर्व १२ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तिथे पोटा न्यायालयाचा निकाल रद्द ठरवून उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
दरम्यान याप्रकरणी नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (सीपीआयएल) या एनजीओकडून करण्यात आली होती. ही याचिका फेटाळताना या एनजीओला ५० हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला. याप्रकरणी कोणत्याही नव्या याचिकेवर विचार केला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यासह आणखीही काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सात वर्षांनंतर आज निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने पोटा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला व १२ पैकी ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
असगर अली, मोहम्मद रऊफ, मोहम्मद परवेज अब्दुल कय्यूम शेख, परवेज खान पठाण उर्फ अतहर परवेज, मोहम्मद फारूख उर्फ हाजी फारूख, शाहनवाज गांधी, कलीम अहमदा उर्फ कलीमुल्लाह, रेहान पुथवाला, मोहम्मद रियाज सरेसवाला, अनीज माचिसवाला, मोहम्मद युनूस सरेसवाला आणि मोहम्मद सैफुद्दीन अशी आरोपींची नावे आहेत.