Dr. Payal Tadavi death case : तिन्हीही डॉक्टर आरोपींची जामिनासाठी हायकोर्टात धाव

नायर रुग्णालय-महाविद्यालयातील ज्युनिअर डॉक्टर पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मागील पाच आठवड्यांपासून अटकेत असलेल्या तिनही महिला डॉक्टरांनी जामीनासाठी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपी डॉक्टर हेमा अहुजा(२८), अंकिता खंडेलवाल(२७) व भक्ती मेहर (२६) यांचे जामीन अर्ज विशेष न्यायालयाने २४ जून रोजी फेटाळले होते.
आरोपींचे वकील जामीन अर्जाची माहिती आता हायकोर्टाला देऊन तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. जामीन मिळण्याविषयी प्रचंड आशावादी असलेल्या तिघी डॉक्टरांचा विशेष न्यायालयात अपेक्षाभंग झाल्याने निर्णय ऐकताच त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या होत्या.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या पायलने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ‘पायलला राखीव कोट्यातून मेडिकल प्रवेश मिळाल्याने तिच्या सिनिअर असलेल्या या तिघी डॉक्टरांकडून तिचे सातत्याने रॅगिंग केले जात होते. तिच्याविरुद्ध जातीवाचक शेरेबाजी केली जात होती. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली’, असा आरोप आहे.