ठाण्यात घर पेटले; एकाच कुटुंबातील चौघे भाजले

कळवा येथील न्यू शिवाजी नगर परिसरात रविवारी सकाळी एका घराला आग लागल्याची घटना घडली. गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानं ही आग लागली. यात एकाच कुटुंबातील चौघे जण भाजले आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कळव्यातील न्यू शिवाजी नगर भागातील रहिवासी रघुनाथ पाटील यांच्या घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानं आग लागली. या आगीत रघुनाथ पाटील (वय ५५) यांच्यासह त्यांची पत्नी संपदा (वय ५०), मुलगी रोहिणी (वय २५), मुलगा रोहन (वय २२) हे चौघेही भाजले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ‘कळवा पूर्वेकडील न्यू शिवाजी नगरातील दत्त मंदिराजवळ रघुनाथ पाटील यांच्या घरात आग लागल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. आगीत भाजलेल्या चौघांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.’ दरम्यान, घरगुती सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यानं आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.