नाशिकजवळ सायकलवारीत ठार झालेल्या ९ वर्षीय मुलाचे अवयव दान करण्याचा कुटुंबीयांचा निर्णय

नाशिकमधल्या सायकलवारीत प्रेम सचिन नाफडे या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत हा मुलगा जागीच मरण पावला. प्रेमच्या मृत्यूच्या बातमीमुळे त्याच्या आई वडिलांना धक्का बसला असला तरी त्यांनी या परिस्थितीतही आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. प्रेमचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देहदान करण्याची इच्छा प्रेमच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे . शवविच्छेदन झाल्यानंतर त्याची त्वचा आणि नेत्र दान केले जाणार आहेत . याबाबतच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
नाशिकमध्ये सायकलवारीला आज सकाळीच सुरूवात झाली होती . मात्र सुरूवात झाल्या झाल्या काही वेळातच प्रेम सचिन नाफडे या विद्यार्थ्याला ट्रकने चिरडले आणि त्याचा मृत्यू झाला. प्रेम नाफडे हा नाशिक येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता. सायकलवारी जेव्हा सिन्नर बायपासजवळ आली तो सायकलवारीचा टी पॉईंट होता.
टी पॉईंटला चहा-नाश्ता झाल्यावर प्रेम रस्त्यावर येऊन उभा राहिला. प्रेम दुसऱ्या लेनवर उभा होता, त्याचवेळी तिथे एक बंद ट्रक उभा होता. या ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता त्याने जोरात हॉर्न वाजवला. ज्यामुळे प्रेम घाबरला त्याला काय करावे ते सुचले नाही. तेवढ्यात ट्रक चालकाने गिअर टाकला. ९ वर्षांचा मुलगा त्या आवाजाला घाबरला, मात्र ट्रक चालकाने ट्रक बाजूला न घेता या मुलाच्या अंगावर घातला. या प्रकारामुळे ९ वर्षांच्या प्रेमचा जागीच चिरडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई वडिलांनी त्याचा देह दान करण्याचा निर्णय घेतला आहे.