मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका: सदावर्ते

मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. तसेच जाधव नावाचे एक पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडूनही ते मराठा असल्याने मला धोका आहे, अशी भीती मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या. आरक्षणविरोधी जनहित याचिकादार जयश्री पाटील यांची बाजू ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधातील या याचिका उच्चा न्यायालयाने आज फेटाळल्या आणि आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वैध ठरवला.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जायचे असल्याने तोपर्यंत या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यातर्फे करण्यात आली होती. मात्र खंडपीठाने ती फेटाळली.
त्यानंतर सदावर्ते माध्यमांना म्हणाले, ‘मराठा आरक्षण निर्णय वैध ठरवणारा निकाल देणाऱ्या खंडपीठातील न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी पूर्वी माझा संबंध असलेल्या याचिकेची सुनावणी घेणार नाही, असे पूर्वीच्या एका प्रकरणात म्हटले होते आणि तसा आदेश काढला होता. तरीही त्यांनी मराठा आरक्षण याचिकांची सुनावणी घेतली. त्यांनी जुना आदेश मागे न घेताच ही सुनावणी घेतली.
याप्रकरणी आम्ही राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टाकडे तक्रार दाखल करणार आहोत. इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे फोन झाले का आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या बाजूने हा निर्णय झाला का, याची मागणीही तक्रारीद्वारे करणार आहे.’
‘जाधव नावाचे एक पोलीस अधिकारी आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडूनही ते मराठा असल्याने मला धोका आहे,’ अशी भीतीही सदावर्ते यांनी व्यक्त केली.