ईव्हीएमवर खासदार उदयनराजे यांची पत्रकार परिषद , कॉम्प्युटर आणि डिजिटल गोष्टी हॅक होऊ शकतात, तर मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही ?

कॉम्प्युटर आणि डिजिटल गोष्टी हॅक होऊ शकतात, तर मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईव्हीएम हॅक होऊ शकतात की नाही, याबाबत इलेक्ट्रॉनिक अभियंता खात्रीने सांगू शकतो. मात्र, आज कोणीही उठून ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा दावा करत आहे, असा टोला उदयनराजेंनी यावेळी लगावला.
आपण एक खासदार, देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय. लोकशाही अबाधित राहावी, यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे ते म्हणाले. कोणतेही उपकरण, यंत्र हे माणूसच बनवितो. कॉम्प्युटर हे सर्वांत चांगले मशीन आहे, मात्र तेही हॅक होते. मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करत साताऱ्यात बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे; सगळा खर्च मी करेन, असे आव्हान उदयनराजेंनी दिले. साताऱ्यात एकूण झालेले मतदान आणि निकालातील मतांमध्ये तफावत आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला.