…अन्यथा राष्ट्रकूल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा

‘बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्यात आल्याने भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महिन्याभरात या दोन्ही खेळांसंबंधी निर्णय न घेतल्यास भारत राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडेल’, असा इशारा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भारताला नेहमीच चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. पदक मिळवण्यासाठी नेमबाजी हे भारतासाठी सर्वात मोठे स्त्रोत आहे. या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आम्हाला माहितीय की, एखादा निर्णय मागे घेणे अवघड आहे. परंतु, पुढील महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धासंबंधी सदस्यांची (कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन) बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय, हे पाहावे लागले, असे राजीव मेहता यांनी सांगितले. राष्ट्रकुल फेडरेशनच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजीला वगळण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महिला क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल आणि पॅरा टेबलटेनिस या तीन नव्या खेळांना या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
तत्कालिन क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राष्ट्रकुल फेडरेशन आणि स्पर्धा संयोजकांना नेमबाजी खेळ स्पर्धेत राहावा यासाठी गेल्या वर्षी पत्र लिहिले होते. नेमबाजी खेळ बाहेर ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६६ पैकी १६ पदके ही नेमबाजीतून मिळाली होती.