ICC World Cup 2019 : आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर खेळणार

पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून विजय शंकर आता सावरला असून तो उद्या (शनिवार) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विजय शंकरलची आज फिटनेस टेस्ट घेण्यात आली. त्यात त्याला थोडं धावायला तसेच गोलंदाजी करण्यास सांगण्यात आलं.
फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि ट्रेनर शंकर बसू यांच्या देखरेखीखाली ही टेस्ट झाली. या टेस्टनंतर विजयच्या फिटनेसबाबतचं त्यांचं मत मात्र समजू शकलं नाही. त्याचवेळी पत्रकार परिषदेत बोलताना विजयने मात्र आपल्या फिटनेसबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. मला विचाराल तर मी आता पूर्णपणे फिट आहे, असे विजय म्हणाला. तू उद्या खेळू शकणार का, असे विचारले असता तशी आशा मला वाटते, असे विजय सूचकपणे बोलला.
दरम्यान, वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू विजय शंकरने प्रभावी गोलंदाजी केली होती. त्यानंतर साऊथॅम्प्टनमध्ये भारतीय संघ दाखल झाला असता सरावादरम्यान जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना त्याचा चेंडू पायाच्या अंगठ्याला लागल्याने विजय जायबंदी झाला होता. आधीच शिखर धवनला दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडावे लागलेले असताना आणखी एका खेळाडूला दुखापत झाल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र ही दुखापत तितकीशी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.