Modi Sarkar 2 : पाकिस्तानी खेळाडू आता खेळासाठी भारतात येऊ शकतात

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. पण आता मोदी सरकारने हे बदलायचे ठरवले आहे. मोदी सरकारने दिलेल्या हमीनुसार आता पाकिस्तानचे खेळाडू भारतामध्ये येऊ शकतात.
केंद्र सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला हमीपत्र लिहून दिले आहे. या हमीपत्रामध्ये आम्ही पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये येण्याची आणि खेळण्याची परवानगी देत आहोत, असे लिहून दिले असल्याचे वृत्त ‘जागरण’ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पुलवामा हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकात खेळू नये, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण भारतीय संघ विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळला आणि त्यांच्याबरोबरचा सामना जिंकला. या विजयानंतर काही दिवसात केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
फेब्रुवारीमध्ये भारतात नेमबाजीचा विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतावे व्हिसा नाकारला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताच्या या गोष्टीवर ताशेरे ओढले होते.