Congress : लोकसभेतील गटनेतेपद स्वीकारण्यासही राहुल गांधी यांचा नकार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील गटनेतेपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षाने ५ वेळा खासदार झालेल्या अधीर रंजन चौधरी यांची गटनेतेपदी निवड केलीय. काँग्रेसच्या संसदेशी संबंधित रणनीती करणाऱ्या समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोनिया गांधी राहुल गांधी, पी. चिदम्बरम, अहमद पटेल, जयराम रमेश यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत अधीर रंजन चौधीर आणि केरळमधील खासदार के. सुरेशही बैठकीत सहभागी झाले होते.
सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना लोकसभेत पक्षाच्या गटनेतेपदाची ऑफर दिली होती. पण हे पद ज्येष्ठ नेत्याला देण्यात यावे, असं सांगत राहुल गांधी यांनी गटनेतेपद स्वीकारण्यास इन्कार केला. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या बैठकीनंतर गटनेतेपदासाठी अधीर रंजन चौधरी यांचे नाव समोर आले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. विदेश दौऱ्यानंतर सोमवारी परतलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद सोडण्याचा पुनरूच्चार केला. यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधी अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर बैठक घेण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.