इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद सुरु , २४ तासांचा संप

कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी संपाला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली आहे. मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर संपकाळात काळ्या फिती लावून काम करणार आहेत. मात्र, खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्यानं रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
‘आयएमए’च्या घोषणेनुसार, सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. त्यामुळं उपचारासाठी नव्यानं रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होणार आहेत. महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत.
डॉक्टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी ‘आयएमए’चे माजी सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा बंद राहिल्यास सार्वजनिक रुग्णव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तयारी करण्यात आल्याचे सार्वजनिक रुग्णालय प्रशासनाकडून रविवारी स्पष्ट करण्यात आले. ‘मार्ड’चा या संपाला पाठिंबा असला तरीही सरकारी रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सेवा बंद राहणार नाही, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले.
‘डॉक्टरांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार घडले असून, त्या प्रत्येकवेळी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आणि हल्लेखोरांवरील कारवाईबाबत मागणी करण्यात आलेली आहे. तरीही अशा घटनांना अद्याप चाप लागलेला नाही. त्यामुळे यापुढे अशाप्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी हे काम बंद आंदोलन आहे. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा अशी डॉक्टरांची त्यामागे भूमिका नाही’, असे ‘आयएमएम’ने स्पष्ट केले आहे.
आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी या काम बंद आंदोलनाला सर्वसामान्यांनीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन संघटनेने केले आहे. अनेक सर्वसामान्य रुग्णांनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनीही डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणून वातावरण अधिक गढूळ करू नका, ही मागणीही या आंदोलनाच्या निमित्ताने केली जाणार आहे.