#ICC #World_Cup : भारत जिंकला !! पाकिस्तानला ८९ धावांनी केले पराभूत !!

अखेर वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान दरम्यान झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला अक्षरश: चारीमुंड्या चित केलं . रोहित शर्माची खणखणीत १४० धावांची खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केलं आणि पाकिस्तानविरोधात एकही न सामना गमावता वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची मान उंचावली.
प्रारंभी दुपारी नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी पाकचा निर्णय फोल ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात करत मैदानात जम बसवला. रोहितनं दमदार फॉर्म कायम ठेवत धावा वसुल केल्या. तर केएल राहुलनं रोहितला चांगली साथ दिली. दोघांनी सलामीसाठी १३६ धावांचं योगदान दिलं. रोहितनं यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतलं दुसरं शतक ठोकलं. रोहितनं ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४० धावा कुटल्या. रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने संघाची धुरा सांभाळली. कोहलीने ६५ चेंडूत ७७ धावांचं योगदान दिलं. सामन्याच्या ४६ व्या षटकात पावसाच्या आगमनामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली होती. अखेरीस पाऊस थांबल्यामुळे सामन्यात ५० षटकांच्या खेळ पूर्ण होऊ शकला.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. भारताने दिलेल्या ३३७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध पवित्रा घेत खेळास सुरुवात केली. पहिल्या १० षटकांच्या अखेरीस पाकिस्तानने १ बाद ३८ धावा केल्या. तर १५ षटकांच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या १ बाद ६४ होती. मात्र त्यानंतर बाबर आझम आणि फखर जमानने शतकी भागिदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली. पण काही वेळातच कुलदीप यादवनं बाबर आझमची विकेट काढत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. ३२ व्या षटकांपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ५ बाद १५४ अशी झाली. त्यानंतर भारत-पाक सामन्यात पावसाचा पुन्हा व्यत्य आला आणि सामना थांबवावा लागला. सुमारे अर्धा तासानंतर खेळ सुरू झाला. मात्र डकवर्थ लूईस नियमानुसार दहा षटकं कमी करून पाकिस्तानला ३०२चं टार्गेट देण्यात आलं. मात्र पाकिस्तानला हे आव्हानही पेलवता आलं नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी घेत भारताचा विजय सोपा केला.