मोदी सरकार २ : लोकसभेचे उद्यापासून अधिवेशन; ५ जुलैला अर्थसंकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले लोकसभा अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. १७ व्या लोकसभेत अनेक नवे चेहरे दिसणार असून, केंद्रीय अर्थसंकल्प, तीन तलाक विधेयक असे महत्त्वाचे विषय पटलावर मांडले जाणार आहेत. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक देश, एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी संसद भवनात सर्वपक्षीयांची बैठक बोलावली असून, १९ जून रोजी ही बैठक होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसकडून बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य, जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक असे काही विषय चर्चेला आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक आयोजित केली होती. या संसदीय अधिवेशनात १० विधेयके मांडली जाण्याची शक्यता असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. २६ जुलै रोजी लोकसभा अधिवेशनाची सांगता होणार आहे.