स्त्री – पुरुष विवाह न करताही एकत्र राहत असतील तर त्यांना विवाहबद्ध जोडपे मानले जाईल , महिलेला पोटगीचाही अधिकार : दिल्ली हाय कोर्ट

जर एखादे जोडपे अनेक वर्षांपासून पती-पत्नीसारखे एकत्र राहत असतील तर ते जोडपे विवाहबद्ध आहेत, असे समजले जाईल. त्यामुळे महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. ती पोटगी मागण्याचा अधिकार त्या महिलेला आहे, असे दिल्ली हायकोर्टाने एका सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने कायद्यात तशी व्यवस्था केली आहे. जर दोघेही पती-पत्नीसारखे राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. स्थानिक कोर्टाने दिलेल्या निर्णयात दखल देण्यास दिल्ली कोर्टाने स्पष्ट नकार दिला. स्थानिक कोर्टाने एका प्रकरणात हा निर्णय दिला होता. पती-पत्नीसारखे एक जोडपे २० वर्ष सोबत राहिले होते. यावर निकाल देताना कोर्टाने प्रेयसीला दर महिन्याला ५ हजार रुपये उदारनिर्वाहसाठी (पोटगी) देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात याचिकाकर्त्याने (पती) हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टाने हा निकाल बरोबर आहे, असे सांगत दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
याचिकाकर्त्याने म्हटले होते की, ती महिला आपली पत्नी नाही. महिलेकडे लग्नाचा कोणताही पुरावा नाही. तर, गेल्या २० वर्षापासून आम्ही एकत्र राहत आहोत, असे महिलेने कोर्टात सांगितले. दोघांचेही मतदान ओळखपत्र आणि पत्ता एकच आहे, असे महिलेने सांगितले. मतदान ओळखपत्रावर पतीचे नाव सुद्धा असल्याचे महिलेने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना याचिकाकर्त्याने स्वतःला महिलेचा पती असल्याचे म्हटले होते, याची नोंद हॉस्पिटलमध्ये आहे, असेही महिलेने म्हटले होते.