Doctors Strike : ममता बॅनर्जींकडून डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन

डॉक्टरांना मारहाणप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मान्य केल्या आहेत. तसेच डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ममता म्हणाल्या, रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी असून याप्रकरणी लवकरच तोडगा काढला जाईल. डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्या मान्य केल्याशिवाय बैठकीला हजर राहणार नाही, अशी भुमिका डॉक्टरांनी घेतली. या संपामुळे गरीबांवर उपचार होऊ शकत नाहीएत. कमीत कमी रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी सेवा सुरु रहायला हव्यात. आम्ही राज्यात एस्मा कायदा लागू करु इच्छित नाही.
ममता म्हणाल्या, आम्ही डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मी काल आणि आज आमच्या मंत्र्यांना, मुख्य सचिवांना डॉक्टरांची भेट घेण्यास पाठवले होते. त्यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी ५ तास वाट पाहिली, मात्र ते आले नाहीत. आपल्याला संविधानिक संस्थांचा सन्मान करायला हवा. आम्ही एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही. कोणत्याही बळाचा वापर करण्याची आमची इच्छा नाही. आरोग्य सेवा अशा प्रकारे विस्कळीत राहू शकत नाही. मी कोणतीही मोठी कारवाई करणार नाही.
दरम्यान, १० जून रोजी निवासी डॉक्टरला मारहाण झालेली घटना दुर्देवी होती. राज्य सरकारने खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधीत मारहाण झालेल्या डॉक्टरच्या सर्व उपचारांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी ममतांशी बंद खोलीत चर्चा करण्यास नकार दिला होता.
West Bengal CM Mamata Banerjee: I appeal to all doctors to resume work as thousands of people are awaiting medical treatment. #DoctorStrike pic.twitter.com/0v8rDxuGFN
— ANI (@ANI) June 15, 2019