वायू चक्रीवादळ : धोका अद्याप जैसे थे , गुजरातमध्ये येत्या ४८ तासांचा हायअलर्ट

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये येत्या ४८ तासांचा हायअलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान, समुद्रामध्ये उंचउंच लाटा येणार आहेत. तसंच या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. समुद्रावर न जाण्याचे आणि मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रामध्ये न उतरण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
वायू चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ केव्हाही कच्छच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वायू चक्रीवादळ पुन्हा प्रभावित होणार असल्यामुळे एनडीआरएफच्या ५२ टीम, एसडीआरएफच्या ९ टीम, एसआरपीच्या १४ टीम, ३०० मरीन कमांडो आणि हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी सज्ज झाले आहेत.
वायू चक्रीवादळ पश्चिम दिशेला वळाले आहे. ज्यामुळे पोरबंदर, देवभूमी द्वारका जिल्ह्यामध्ये ५०-६० कमी प्रती तास ते ७० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहे. तर सोमनाथ आणि जूनागड जिल्ह्यामध्ये ३०-४० किमी प्रति तास ते ५० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. वायू चक्रीवादळ पुढच्या ४८ तासामध्ये पश्चिम दिशेकडे पुढे सरकणार आहे. त्यानंतर उत्तर-पूर्व दिशेला वळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.