काँग्रेस -राष्ट्रवादी आणि भाजप सेनेला सशक्त पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय : प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या वंचित आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही मतदारसंघात धक्का दिल्याने आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद सारख्या मतदारसंघात वंचित आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याने सध्या वंचितांची आघाडी चर्चेचा विषय झाली आहे. . एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना आंबेडकरांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वंचित आघाडीमुळे निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलण्याचा संकल्प वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे .
राजकीय अभ्यासकांच्या मते , लोकसभा निवडणुकीत वंचितला केवळ एकच जागा मिळाली असली तरी त्यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अनेक जागांवर पराभव स्विकारावा लागला आहे. दरम्यान एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा मेगाप्लॅन सांगितला असून वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहोत. राज्यातील वंचित घटकाचा आम्ही आवाज होऊ. सध्या राज्यात पाणी टंचाई आहे. हाच मुद्दा आम्ही निवडणुकीत उपस्थित करू, कारण विरोधकांना कधीच हा प्रश्न लावून धरता आला नाही. निवडणुकीच्या आधी मतदारांना आमचे व्हिजन सांगू आणि त्याआधारेच मतदान करण्याचे आव्हान करू. इतकच नव्हे तर लवकरच वंचित आघाडी संपूर्ण देशभरात विस्तार करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. आमची वेळ आली आहे, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.