काँग्रेस – वंचित आघाडीच्या युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांनीच पुढाकार घ्यावा , काँग्रेसच्या बैठकीतील मत

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष तयारीला लागले असून लोकसभेत चारीमुंड्या चित झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात मात्र अजूनही निराशेचे वातावरण आहे . त्यामुळे विधानसभेत काय करायचं यावरून काँग्रेसमध्ये जोरदार खलबतं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस वंचितसोबत जाण्यास तयार आहे मात्र त्यासाठी पुढाकार प्रकाश आंबेडकरांनी घ्यावा असं काँग्रेसचं मत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . काँग्रेसच्या नेत्यांची आज विधानसभा तयारीबाबात बैठक झालीया बैठकीत हे मत व्यक्त झाल्याची माहिती आहे .
लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने तयारी दाखवली होती. मात्र प्रकाश आंबेडकरांना आघाडी करण्याची इच्छा नव्हती असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर काँग्रेसच्या अटींवर आघाडी होणार नाही असं आंबेडकरांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठी आघाडीसाठी पुढे गेलं पाहिजे असं काँग्रेसमधल्या एका गटाचं मत आहे. तर दबावाला बळी पडू नये असं काही नेत्यांना वाटत आहे . आजच्या बैठाईत झालेल्या चर्चेवरून काँग्रेसने आघाडी करण्याबाबतचा चेंडू आज वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात टोलवला आहे. आता प्रकाश आंबेडकर त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे .