ParbhaniNewsUpdate : परभणीत वंचितचे हवामान बदलून पंजाब डख भाजपात दाखल

परभणी : सोशल मीडियातून प्रसिद्ध झालेले परभणीतील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आज वंचितचे हवमान बदलून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ते वंचित बाहुजन आघाडीचे उमेदवार होते
भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते पंजाबराव डख यांनी भाजपात प्रवेश करुन कमळाचा गमछा गळ्यात घातला. हवामान तज्ज्ञ अशी ओळख असलेल्या पंजाबराव डख यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे. आता, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार तथा उमेदवार मेघना बोर्डीकर यांचा प्रचार ते करणार आहेत. पंजाब डख यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता वंचित सोडून ते भाजपमध्ये गेले आहेत आणि भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, वंचितचा अंदाज चुकल्याने ते आता भाजपात गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय भांबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले, सुरेश नांगरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.