BJPNewsUpdate : व्होट जिहादवरून देवेंद्र फडणवीस यांचा धुळ्यात पुन्हा हल्ला बोल

धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धुराळा उडाला आहे. आज धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेतून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्होट जिहादचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या गोष्टीचा आनंद आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात धुळ्यातून होत आहे. मोदींच्या माध्यमातून 10 वर्षात जी काम झाले आहेत त्यामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रामधील नंबर एकचा जिल्हा होतोय. धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई जाणवणार नाही असे काम होत आहे. महाराष्ट्राचे पुढचे इंडस्ट्री आणि लॉजिसस्टिक सेंटर धुळे आहे. धुळ्याला नंबर वनचा जिल्हा करण्याचा चंग मोदींनी बांधलाय.
पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार लाडकी बहीण, मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. विजबिलातून शेतकऱ्यांना मुक्ती दिली आहे. पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती दिली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
व्होट जिहादमुळे धुळ्याची जागा गेली
ते पुढे म्हणाले की, एकीकडे आम्ही विकास करतोय तर दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून धुळ्यात व्होट जिहाद करताय. लोकसभेत व्होट जिहादमुळे धुळ्याची जागा गेली. आता जागे झाले नाही तर पुन्हा व्होट जिहादला सामोरे जावे लागेल. ही निवडणूक जागे होण्याची आहे, असा हल्लबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.