महाराष्ट्र कसा चालवायचा याचा निकाल देण्याची वेळ आली आहे ! राज्यातील 64 हजार महिला , मुली बेपत्ता : शरद पवार

मुंबई : “महाराष्ट्र ऐकीकाळी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अत्यंत मोलांची कामगिरी करणारं राज्य होतं. आज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या वाढली आहे. राज्यामध्ये आज 64 हजार महिला-मुली बेपत्ता आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. ही स्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती. शिक्षणासंबंधी प्रगत राज्य होतं. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे”, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळी आपण लोकांनी आम्हा लोकांना शक्ती दिली. महाराष्ट्राची शक्ती देशाच्या संसदेमध्ये विविध प्रश्नांची मांडणी करत आहे. याच श्रेय तुमचं आहे. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली. महाराष्ट्र कसा चालवायचा याचा निकाल देण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्वाखालील सरकार सोडलं तर महाराष्ट्राला मागे नेणारा मागील अडीच वर्षाचा कालखंड आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, गुंतवणुकीत महाराष्ट्र मागे पडला. दरडोई उत्तप्नाच्या बाबतही महाराष्ट्र घसरला आहे. हल्लीच्या राजवटीमध्ये भ्रष्टाचार टोकाला गेला आहे. याचं उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुतळा बांधणीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा किती काळापासून उभा आहे, त्याला काही झालं नाही.मोदींच्या हस्ते उद्घाटन होतं आणि तो पुतळा पडतो. त्यामुळं शिवछत्रपतींचा अपमान झाला.
मनमोहन सिंग यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी 3 टक्के व्याजदर आणला. महाविकास आघाडी सरकार आलं तर पंचसुत्रीमध्ये ३ लाख पर्यंतंच कर्ज़ माफ केलं जाईल. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन दिलं जाईल, असं आश्वासनही शरद पवार यांनी दिलं.
मोदी हे खोट्यांचे सरदार….
दरम्यान 15 लाख रूपये देण्याची गॅरंटी मोदींनी दिली होती. 2 कोटी रोजगार देणार होते. एमएसपी डब्बल करणार होते. पण यातील काहीच केले नाही. मोदी हे खोट्यांचे सरदार आहेत. 25 हजार कोटी हे कर्नाटक सरकारने पाच गॅरंटीसाठी दिलेत. यांची गॅरंटी फक्त अदानी,अंबानींसाठी आहे. आम्ही एकत्र राहिलो तर मुंबईला कुणी लुटू नाही शकत. टीका करून व आम्हाला शिव्या देवून जनतेचे पोट भरत नाही, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.