VBANewsUpdate : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला….

नांदेड : खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर होत असलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अविनाश भोसीकर यांनाच उमेदवारी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्र 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर.! #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/3WoVmizUt4
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 28, 2024
भोसीकर हे लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जातात . लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये वंचितचे अविनाश भोसीकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना एकूण ९२५१२ मते मिळाली होती. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर ४६९४५२ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. तर, काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी ५९४४२ मतांनी विजय मिळवला होता.
दरम्यान, नांदेडच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजपला नांदेडसाठी उमेदवार मिळत नव्हता. पण, अखेर भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे भाऊ आहेत.