VBA NewsUpdate : प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा , दुबई विमानतळावर शरद पवार यांनी घेतली होती दाऊदची भेट ….

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असेही ते म्हणाले. ही माहिती सरकारला होती का याची माहिती केंद्र सरकारने द्यावी असे आव्हानही आंबेडकर यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की , “१९८८ ते १९९१ दरम्यान शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, या काळात शरद पवार लंडनला गेले होते. तिथून कॅलिफोर्नियाला गेले, तिथे २ दिवस थांबले. कॅलिफोर्नियात त्यांनी एक बैठक घेतली. तिथून शरद पवार लंडनला परत आले. तिथून दोन दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवर त्यांची दाऊद इब्राहिमबरोबर भेट झाली, दाऊदने त्यांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून शरद पवार पुन्हा लंडनला गेले आणि भारतात परतले”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे….
“केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही मुख्यमंत्र्याला विदेशात जाता येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला त्यावेळच्या सरकारची मान्यता होती का? कॅलिफोर्नियात शरद पवार यांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का? आणि शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची सरकारला माहिती होती का? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे ”, अशी मागणीही त्यांनी केली.
“निवडणुकीच्या तोंडावर मी हे आरोप करतो आहे, कारण…”
पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यात शांतता राखायची असेल तर अशा पक्षांना मतदान करायचे की नाही, हे जनतेला ठरावावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर मी हे आरोप करतो आहे, कारण राज्यात १९९० आणि २००० दशकाची परिस्थिती पुन्हा येईल, असं दिसते आहे. गोळीबारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाबा सिद्दीकींची उघडपणे हत्या करण्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता मागचा इतिहास आपल्याला पाहायला हवा”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.