MumbaiNewsUpdate : उत्तर मध्य मुंबईतून आशिष शेलार विरुद्ध राज बब्बर यांच्या लढतीची शक्यता ….

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा घोळ अद्याप चालूच आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक २३ तर काँग्रेसने १२ उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवून त्या पैकी २३ जागा जिंकल्या. या २३ पैकी २२ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केलेले आहेत. तर उर्वरित जागांची चर्चा चालू आहे.
घोषित जागांपैकी भाजपने अद्याप उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत भाजपचे एकूण ३ खासदार आहेत. त्यातील २ खासदारांचा पत्ता कट झाला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोटक यांच्या ऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान पूनम महाजन यांच्या जागेवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव पुढे येत आहे. महाजन यांच्या मतदारसंघात विधानसभेच्या ६ मतदार संघ येतात. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघाचाही याच लोकसभेत समावेश होतो. वांद्रे पश्चिममध्ये शेलार यांनी दोन वेळा ते २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यामुळे महाजनांच्या जागी शेलार यांना संधी दिली जाऊ शकते.
राज बब्बर यांच्या नावाची चर्चा …
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ २००४ ते २०१४ या कालावधीत काँग्रेसकडे होता. २००४ मध्ये इथून एकनाथ गायकवाड, तर २००९ मध्ये प्रिया दत्त निवडून आल्या. पण गेल्या निवडणुकांमध्ये दत्त इथून पराभूत झाल्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.