मराठा समाजाच्या उमेदवारीने काहीही फरक पडणार नाही , सगळ्यात जास्त मराठा समाज भाजप बरोबर…

उस्मानाबाद : मराठा समाजाच्या उमेदवारीने भाजपला पडणार नाही. सगळ्यात जास्त मराठा समाज भाजपसोबत आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या निर्णयावर टिपण्णी केली आहे . नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांंशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी काल रविवारी अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातील मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असे आवाहन त्यांनी या बैठकीत बोलताना केले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या या आवाहनावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाच्या उमेदवारीनं कुठलाच फरक पडणार नाही, सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. स्वतः मी ९६ कुळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे एक तर ते उमेदवार उभे करणार नाहीत किंवा केले तरी फरक पडणार नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असे साकडे मी आई तुळजाभवानीला घातले आहे. पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बीड लोकसभेच्या भाजपच्या खासदार पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना राजकारण करायचे नाही हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. त्यांनी आंदोलन सावरले. अराजकीय भूमिकेवर ठाम राहिल्याने पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे अभिंनंदन केलं आहे. पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही मते निर्णायक ठरू शकतात.