ठाकरे गटा पाठोपाठ एकनाथ शिंदे यांची यादीही उद्या , औरंगाबादची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता…

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाबरोबरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची पहिली यादीही उद्या २६ मार्चला जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान महायुतीकडून आतापर्यंत भाजपाने २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. संभाव्य यादीमध्ये औरंगाबादच्या जागेची घोषणा नसल्याने ही जागा भाजपला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. या जागेवर शिवसेनेच्या वतीने संदीपान भुमरे यांनी हक्क सांगितला होता.
शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी उद्या जाहीर होईल असे संजय मंडलिक यांनी सांगितले आहे. या संभाव्य यादीनुसार रामटेकमधून राजू पारवे, वाशिम-यवतमाळमधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे असतील…
संभाव्य उमेदवार?
रामटेक – राजू पारवे
वाशिम-यवतमाळ – संजय राठोड
ठाणे – प्रताप सरनाईक
कल्याण डोंबिवली – श्रीकांत शिंदे
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
मावळ – श्रीरंग बारणे
कोल्हापूर – संजय मंडलिक
हातकणंगले – धैर्यशील माने
बुलढाणा – प्रतापराव जाधव
शिर्डी – सदाशिव लोखंडे
दरम्यान हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर अद्यापही महायुतीत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये पुन्हा उमेदवारी मिळावी आणि ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी हेमंत गोडसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांनी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले.
याशिवाय मनसेच्या महायुतीतील चर्चेमुळे दक्षिण मुंबईतील जागेवरही अद्याप कुणाचे नाव पुढे आले नाही. दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेची आहे. याठिकाणी विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलेत. त्यात या जागेवर भाजपाचे राहुल नार्वेकर निवडणूक लढवतील असे सांगितले जात होते. त्यानुसार नार्वेकर प्रचारालाही लागले. परंतु त्याच काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाईल असे सांगण्यात येत आहे.