BJPNewsUpdate : भाजपच्या दुसऱ्या ७२ जणांच्या यादीत भाजपकडून सहा जणांना डच्चू

नवी दिल्ली : भाजपनं पहिल्या यादीत लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या ७२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या या दोन्ही याद्यांमधून काही ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिलेली आहे तर काही जणांना नारळ दिला आहे. महाराष्ट्रात आज जाहीर झालेल्या यादीत ५ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपच्या दोन्ही याद्यांमध्ये राजधानी नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. पहिल्या यादीत भाजपने दिल्लीत ५ उमेदवार जाहीर केले होते. तर आताच्या यादीत भाजपने २ उमेदवार जाहीर केले आहेत. या सात जागांपैकी सहा जागांवर भाजपने नवे उमेदवार दिले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सात उमेदवार दिल्लीतून विजयी झाले होते. यामध्ये गौतम गंभीर, हंसराज हंस, मीनाक्षी लेखी, डॉ. हर्षवर्धन, मनोज तिवारी,परवेश वर्मा आणि रमेश बिधुडी हे विजयी झाले होते. भाजपने यापैकी मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली तर इतरांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये डॉ. हर्षवर्धन आणि गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.
दिल्लीत कुणाला उमेदवारी देण्यात आली?
गौतम गंभीरच्या पूर्व दिल्ली मतदारसंघात हर्ष मल्होत्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हंसराज हंस यांच्या उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघात योगेंद्र चंदोलिया, मीनाक्षी लेखी यांच्या नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्या चांदणी चौक मतदारसंघातून प्रवीण खंडेलवाल यांना संधी देण्यात आली आहे. उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. परवेश वर्मा यांच्या जागी पश्चिम दिल्लीतून कमलजीत सहरावत आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुडी यांच्या जागी रामवीर बिधुडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.