RajyasabhaNewsUpdate : संसदेतील गोंधळानंतर राज्यसभेत झाली खडाजंगी ….

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटीच्या गोंधळानंतर राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच खडाजंगी झाली . यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन्ही सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर भाष्य करण्याची मागणी करत ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे सांगितले. तर यावर सरकारने राजकारण केले जात असल्याचे उत्तर दिले.
या घटनेवर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत सांगितले की, लोकसभेत उडी घेणाऱ्या दोघांनी गोंधळ घातला. ही गोष्ट खूप गंभीर आहे. हा केवळ लोकसभा आणि राज्यसभेचा प्रश्न नाही, पण एवढ्या कडेकोट सुरक्षेचा कोणी कसा भंग केला हा प्रश्न आहे.
दरम्यान त्यांच्या व्यत्यय आणत राज्यसभेचे सभापति जगदीप धनखर म्हणाले, “मला या प्रकरणाची माहिती मिळताच मी सुरक्षा संचालकांना फोन केला. मी त्यांना अपडेट विचारले. ही चिंतेची बाब आहे. पान उत्तर देण्यासाठी वेळ द्या. त्यावर खरगे म्हणाले की, तुम्ही वेळ देण्यासाठी बोलत आहात आणि इथे लोकांचा जीव जात आहे.
विरोधी खासदारांचा वॉकआऊट
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, लोकसभेत घडलेल्या अत्यंत असामान्य घटना आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर वक्तव्य देण्यास नकार दिल्याने भारतीय पक्षांनी दुपारी राज्यसभेतून सभात्याग केला. बावीस वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या दिवशी सुरक्षेत एवढी मोठी कुचराई झाली, ही गंभीर बाब आहे.
सरकारने दिले उत्तर….
काँग्रेसच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, काँग्रेस या घटनेवर राजकारण करत आहे. ते म्हणाले, “घडलेली घटना दुःखद आहे. अशा स्थितीत विरोधकांची वृत्ती अशी आहे… देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आपण सर्वजण एकत्र उभे आहोत, असा संदेश देशाला द्यायला हवा. या सगळ्यापेक्षा देशाची ताकद आहे, असा संदेश राज्यसभेतून द्यायला हवा. सभागृह चालले पाहिजे. काँग्रेस राजकारण करत आहे. हा देशासाठी चांगला संदेश नाही. तपास सुरू आहे.