ParliamentNewsUpdate : संसदेत हंगामा करणाऱ्या आंदोलकांनी “जय भीम “, “जय भारत”च्या घोषणा देत सांगितले आपल्या कृत्याचे कारण ….

नवी दिल्ली : लोकसभेच्या सुरक्षा यंत्रणेला आव्हान देत संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारे आणि त्यांच्या सोबत या प्रकरणात सहभागी असलेले तरुण नेमके कोण आहेत ? आणि त्यांनी हे कृत्य का केले ? याविषयी पोलिस कसून चौकशी करीत आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, यावेळी संसद भवन परिसरात ताब्यात घेतलेला तरुण आणि तरुणी तानाशाही नही चलेगी , भारत माता की जय, जय भीम आणि जय भारतच्या घोषणा देत होते.
दरम्यान पोलिसानी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणातील सहाही आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि ते गुरुग्राममधील सेक्टर ७ मधील हाउसिंग बोर्ड कॉलनीत एकत्र राहत होते. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेल्यांकडून कोणताही मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला नाही, तपास सुरू आहे. दिल्ली पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचा शोध घेत आहेत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जे पांच लोक संसद भवनात आले होते. त्यापैकी चौघांनी (नीलम, मनोरंजन, सागर, अमोल) आपले मोबाईल ललितला दिले होते. येथे गोंधळ सुरू होताच ललितने घटनास्थळावरून पळ काढला. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे मोबाईल ललितकडे आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली पोलीस ललितचा शोध घेत आहेत.
हे सर्व का केले ? निलमने सांगितले कारण ….
नीलमला पोलिस घेऊन जात असताना तिने बेरोजगारीमुळे हे सर्व केल्याचे सांगितले. ती म्हणाली की , “आम्ही आमच्या हक्काविषयी बोलतो तेव्हा आम्हाला लाठीमार करून आत फेकले जाते. यातना दिल्या जातात. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही कोणत्याही संघटनेचे नाही, आम्ही बेरोजगार आहोत. प्रत्येक ठिकाणी ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. तानाशाही नही चलेगी. भारत माता की जय .”
सागर शर्माने सकाळी सोशल मिडियावर केली होती पोस्ट
संसद भवनात हे कृत्य करण्यापूर्वी सागर शर्माने सकाळी ६ वाजता त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक कथा पोस्ट केली. या कथेत त्यांनी लिहिले आहे की,”जीते या हारें पर कोशिश तो जरूरी है. अब देखना ये है कि सफर कितना हसीन होगा. उम्मीद है फिर मिलेंगे.”
सागरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पापोनने गायलेले गाणेही समाविष्ट केले आहे. पापोनचे हे गाणे अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटातील आहे. गाण्याचे बोल काहीसे असे आहेत, ”मर भी गया अगर, मरने का गम नहीं, देख ज़रा मेरा हौसला, मुझको डरा सके…तुझमें वो दम नहीं…सुन ले जहां मेरा फैसला…”
अमोल शिंदे आणि नीलम यांना पोलिसांनी संसद भवनाबाहेरून ताब्यात घेतले. अमोल हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे, तर नीलम हरियाणातील घसोस, जिंद येथील रहिवासी आहे.
लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारून धूर पसरवल्याबद्दल पोलिसांनी नीलम आणि अमोल शिंदे यांच्याशिवाय सागर आणि मनोरंजन या दोघांना अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या गुन्ह्यात सहा जणांचा सहभाग होता, मात्र दोन अजूनही फरार आहेत.