ParliamentNewsUpdate : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द …

नवी दिल्ली : कॅश फॉर क्वेरी म्हणजेच पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली होती. दरम्यान या कारवाईला विरोध करणाऱ्या खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी खासदार संसद भवनाबाहेर आले. यामध्ये सोनिया गांधी यांचाही सहभाग होता.
तत्पूर्वी लोकसभेच्या आचार समितीच्या अहवालावर अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी मोईत्रा यांना बोलण्याची संधी दिली नाही. ते म्हणाले की, मोईत्रा यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडले आहे. संसद सदस्यत्व रद्द करण्याबाबत मोईत्रा म्हणाल्या की, मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे मला संसदेच्या सदस्यत्वातून बडतर्फ करण्यात आले आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता.
महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील नीतिशास्त्र समितीच्या अहवालावर लोकसभेत घाईघाईने चर्चा झाल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. हे ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वाचे उल्लंघन असल्याचे पक्षाने म्हटले आहे. अहवाल वाचण्यासाठी सदस्यांना तीन-चार दिवसांचा अवधी दिला असता तर ‘आभाळ कोसळले नसते’.