MaharashtraPoliticlUpdate : पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी सत्ताधारी तीन पक्षांच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच , १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई : आगामी निवडणूक लाक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळावे म्हणून तीन पक्षांच्या सरकारमध्ये मोठा संघर्ष चालू आहे. अखेर राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.
नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकचे पालकमंत्री पद विद्यमान शिवसेनेचे दादा भुसे आहेत. या जागेवर भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा दावा आहे. मात्र, दोघांच्या या दाव्यामध्ये भुजबळ आणि महाजन यांचा दावा पेंडिंग ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद
नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या बाबतीत अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले होते. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. आज अखेर हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील