MarathaAndolanUpdate : आज जाहीर करू आंदोलकांची भूमिका : मनोज जरांगे

जालना : महाराष्ट्रातील मराठा समाजाला वंशावळी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी सरकारनं मागितला आहे. निजामकाळातील आरक्षण होतं तसंच्या तसं लागू करण्यात येईल , या तीन मुद्यावर आम्ही चर्चा करणार आणि उद्या सकाळी अकरा वाजता निर्णय जाहीर करु, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजासह महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्यावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी वेगवेगळी कारणं देऊन सरकारने आणखी वेळ मागू नये. हा तिढा सोडवण्यासाठी हवे तितके पुरावे आम्ही तुम्हाला देतो, तसेच तज्ज्ञांचं पथकही देतो, डंपर भरून पुरावे पुरवले जातील. केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येतील इतके पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. हैदराबादपासून मुंबईपर्यंतचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सगळे पुरावे सरकारला मिळतील. सरकारने केवळ याबाबत वटहुकूम काढण्याची आवश्यकता आहे.
पत्रकाराच्या प्रश्नावर भडकले जरांगे
दरम्यान, या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटलांना विचारलं की तुमचं हे आंदोलन एका विशिष्ट पक्षाच्या ध्येयधोरणाने सुरू असून तुम्ही केवळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप काहींनी तुमच्यावर केला आहे. तुमच्या आंदोलनात राजकारण शिरलंय असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, जातीवंत तरुणांनी उभा केलेला हा लढा आहे, हे कुठल्या राजकारण्याचं आंदोलन नाही.
माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे ?
या प्रश्नावर संतप्त होत मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे आणि मलाही माहिती आहे माझा समाज काय आणि कसा आहे. त्याला (आरोप करणाऱ्याला) म्हणावं, तू तुझे उद्योग बघ. आमच्या लफड्यात पडू नको. हे खानदानी पोरांनी उभं केलेलं आंदोलन आहे. राजकारण्यांनी केलेलं नव्हे. ही सगळी जातीवंत पोरं आहेत. महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील गरिबांची लेकरं आहेत. आम्ही आमच्या भाकऱ्या आणतो, आमची चटणी खातो आणि उघड्यावर झोपतो. हे कोणा राजकारण्याचं आंदोलन नाही. उगाच आमच्या आंदोलनाला डाग लावू नका. नाव समजलं (आरोप करणाऱ्याचं) तर तुझं टमरेलच वाजवेन.
आरक्षणाच्या तिढ्यावर आणि राज्य सरकारने मागितलेल्या कालावधीबाबत मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही राज्य सरकारला जो चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यात आज दुसऱ्या दिवशी योगायोगाने मंत्रिमंडळ बैठकही झाली आहे. या चार दिवसांच्या काळात एक मंत्रिमंडळ बैठक झाली म्हणजे आरक्षणाविषयी निर्णय घ्यायचा असेल तर अडचण नाही.