SharadPawarNewsUpdate : शरद पवार यांचं चाललंय काय ? विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शंका , कुशंका …

राष्ट्रपतींच्या भेटीच्या वेळी हजर असलेले पवार पत्रकार परिषदेला गैरहजर !!
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारासोबतच विरोधी पक्ष नूहमधील हिंसाचारालाही मुद्दा बनवत आहेत. मणिपूर हिंसाचार संदर्भात इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेविषयी विरोधी पक्षात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीवरून आक्रमक झालेले शरद पवार राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान भाजपसोबत गेलेले अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि काही आमदारांच्या भेटीनंतर आणि विरोधी पक्षांचा विरोध डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला पुण्यात लावलेली उपस्थित यावर कुठलेही भाष्य किंवा खुलासा न करता शांत असल्याने त्यांच्या या भूमिकेवरून सर्वत्र चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेतील कमी संख्याबळ असल्याने दिल्ली विधेयकावरून विरोधक अतीआत्मविश्वासात असताना अचानक एनडीएला समर्थन देणाऱ्या सदस्यांची संख्या १६ ने वाढली आहे. यातच आता ज्यांच्याबद्दल कधीच काही सांगता येत नाही अशा शरद पवारांनी विरोधकांच्या हातावर तुरी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पत्रकार परिषदेत काय घडले ?
विरोधकांच्या आघाडीचे नेते गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये गेले होते. तेथील परिस्थिती या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितली होती. यानंतर ते राष्ट्रपतींनी भेटणार होते. बुधवारी हे नेते राष्ट्रपतींनी भेटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, फारुख अब्दुल्ला , आप नेते संजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह भारतातील अनेक नेते राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीला उपस्थित होते.मात्र बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत असे काही घडले, जे या नेत्यांना अपेक्षित नव्हते.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर खर्गे पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला इतर सर्व नेते उपस्थित होते. परंतू शरद पवार नव्हते. शरद पवार येत असतील असे खर्गेंना वाटले आणि ते त्यांना आजुबाजुला शोधू लागले. परंतू, पवार आलेच नाहीत. राष्ट्रपतींना भेटताना मात्र पवार शिष्टमंडळासोबत होते. यामुळे लगेचच पुण्यातील मोदींचा कार्यक्रम आणि पवारांची उपस्थिती, मोदींच्या पाठीवर ठेवलेला हात याची चांगलीच चर्चा होत आहे. विरोधकांच्या पत्रकार परिषदेपासून शरद पवार जाणीवपूर्वक दूर राहिले का? पवारांना मोदी सरकारविरोधात बोलणे टाळायचे होते का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. काल विरोधकांच्या शिष्ट मंडळात दिल्लीत दिसलेले पवार २४ तासांपूर्वी पुण्यात होते म्हणून ही चर्चा आहे.
शरद पवारांच्या आधीच्या भूमिका
याआधीही पवारांनी विरोधकांकडून वेगळा सूर लावल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. अदानीच्या मुद्द्यावर विरोधक जेपीसीची मागणी करत असताना शरद पवारांनी जेपीसीची मागणी निरुपयोगी असल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित होत असताना पवार म्हणाले की पदवी हा मुद्दा नाही. ऑक्टोबर २०१८ मध्ये शरद पवार म्हणाले होते की, राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेतूबद्दल लोकांना शंका नाही. पवार सध्या विरोधी आघाडीसोबत दिसत असले तरी त्यांची भाजपसोबतची लव्ह-हेट स्टोरी जुनी आहे. भाजप सरकारमध्ये पुतणे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. आणि २०१४ मध्ये राष्ट्रवादीने महाराष्ट्रात भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. मार्च २०२३ मध्ये, राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी नागालँडमधील भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला. हे सर्व शरद पवार यांच्या संमतीने झाले. त्यामुळेच आज शरद पवारांचे कोडे काय असा प्रश्न विरोधी छावणीत आहे.