MaharashtraPoliticalUpdate : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे वडेट्टीवार, सभागृहाकडून स्वागत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष पदावर काँग्रेसने हक्क सांगितला होता त्यानुसार आज विधान सभेचे सभापती नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांची या पदावर निवड केली. गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले, त्यामुळे विरोधात काँग्रेस आमदारांची संख्या अधिक असल्याने हे पद काँग्रेसला मिळाले आहे.
अलीकडेच विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस विधिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सर्व आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी वड्डेटीवार यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विजय वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वडेट्टीवार विदर्भातील नेते आणि आमचे उपमुख्यमंत्रीदेखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याला वेगळा गुण असतो. त्यामुळे राज्याच्या इतिहासात ४ विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाला देशातील राष्ट्रपती मिळाले. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातभार कुणी धरू शकत नाही असं कौतुक शिंदेंनी केले.
दरम्यान, कुठल्याही सत्तेत विरोधी पक्षनेत्याला फार महत्त्व असते. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर जेव्हा आपली सत्ता येते, तेव्हा दुर्दैवाने तशी खाती मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. निवडणुकीला १३-१४ महिने आहेत. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते बनवले आहे. या पदाचा तुम्ही चांगला उपयोग कराल अशी अपेक्षा आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.