प्रसिद्ध कवी ना. धो . महानोर यांचे निधन

पुणे : निसर्गकवी, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ना. धो. महानोर यांचं लिखाण हे निसर्गाशी नातं जोडणारं होतं. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल होते. ‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा’रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचं. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे दोन मुले आणि तीन कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे.
ना. धो. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. ‘दिवेलागणीची वेळ’,’पळसखेडची गाणी’,’जगाला प्रेम अर्पावे’,’गंगा वाहू दे निर्मळ’ ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
चित्रपटांसाठी गीतलेखन
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
कवी ना.धों. महानोर यांची ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती या लोकप्रिय गीतांचे ना.धों. महानोर हे रचयिता आहेत.
जवळचा मित्र गेल्याचं दु:ख : शरद पवार
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले.
ना.धों. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडलाच. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.